चाकूच्या वारांनी संपलं मैत्रीचं नातं; गोंडपिपरीत खळबळ
🔴 किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू; मित्रानेच केला प्राणघातक हल्ला
गोंडपिपरी: तालुक्यातील वढोली येथे किरकोळ वादाचे रूपांतर भीषण संघर्षात होऊन एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्रावर धारदार चाकूने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वढोली गावातील काही युवक नेहमीप्रमाणे एकत्र बसून चर्चा करत होते. याचवेळी वैभव साईनाथ आळे आणि परिमल झाडे या दोन मित्रांमध्ये जुन्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. पाहता पाहता वादाने उग्र रूप धारण केले आणि त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. संतापाच्या भरात परिमल झाडे याने जवळील धारदार चाकूने वैभववर प्राणघातक हल्ला केला.
गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैभवला ग्रामस्थांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया सुरू असतानाच वैभवची प्राणज्योत मालवली. ऐन तारुण्यात झालेल्या या मृत्यूमुळे वढोली गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आरोपी परिमल झाडे हा सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
किरकोळ कारणातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.







