चामोर्शी (प्रतिनिधी) – NSUI च्या कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत असून, अटकेत असलेल्या अखिलेश यादव व इतर सहकारी कार्यकर्त्यांची तात्काळ बिनशर्त सुटका करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
दूरदर्शनशी संबंधित DD न्यूजचे पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ NSUI कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण आंदोलन छेडले होते. मात्र, या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
NSUI पदाधिकाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आरोप केला की, एका बाजूला सार्वजनिक माध्यमांवरून राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केली जातात, तर दुसऱ्या बाजूला युवकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यास त्यांच्यावर दडपशाही केली जाते. ही बाब लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर टीका करत शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखिलेशसह सर्व अटक करण्यात आलेल्या NSUI कार्यकर्त्यांची तात्काळ बिनशर्त सुटका करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, चामोर्शी येथे NSUI च्या वतीने मा. वैद्य साहेब, नायब तहसीलदार यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, उपाध्यक्ष तेजस कोंडेकर, महासचिव साहिल धोबे, साहिल सातपुते तसेच NSUI चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.