गडचिरोली : माओवादविरोधी लढ्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचेच अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांची नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नीलोत्पल यांनी आपल्या कार्यकाळात माओवाद्यांविरोधात अनेक प्रभावी मोहिमा राबवत मोठे यश संपादन केले. भूपतीसह अनेक कडव्या माओवादी नेत्यांना शरण आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. शांत, संयमी स्वभाव आणि धडाकेबाज कारवाई यामुळे त्यांनी गडचिरोलीत विशेष ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने माओवाद्यांविरोधातील कारवायांमध्ये मोठी आघाडी घेतली, ज्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षा परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. त्यामुळे नीलोत्पल यांची कारकीर्द गडचिरोलीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, नवे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणारे एम. रमेश यांनीही यापूर्वी अनेक माओवादविरोधी मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर गडचिरोलीत माओवादविरोधी कारवाई अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बदलामुळे गडचिरोली पोलिस दलात नव्या जोमाने कामकाज सुरू राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे.