HomeBreaking Newsअतिक्रमणामुळे चामोर्शीत वाहतूक कोंडी; प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका

अतिक्रमणामुळे चामोर्शीत वाहतूक कोंडी; प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका

अतिक्रमणामुळे चामोर्शीत वाहतूक कोंडी; प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका

चामोर्शी प्रतिनिधी , ता. मुख्यालय चामोर्शी शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यांवर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन धोक्यात आले आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक विविध कामांसाठी येथे येत असतात. मात्र, शहरातील मुख्य मार्ग अतिक्रमणामुळे अरुंद झाल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे परिस्थिती आणखी बिकट होते. बाजाराच्या दिवशी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानदारांनी केलेले अतिक्रमण आणि त्यात भर म्हणून जड वाहनांची सुरू असलेली वाहतूक यामुळे संपूर्ण मार्ग ठप्प होतो. तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या महत्त्वाच्या कार्यालयांमुळेही या परिसरात सतत वर्दळ असते.

काही दुकानदारांनी रस्त्यावर शेड, साहित्य आणि फलक लावून उघडपणे अतिक्रमण केले असून नाल्याबाहेरपर्यंत सामान मांडल्याने रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. परिणामी पादचारी, विद्यार्थी, महिला तसेच रुग्णवाहिकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः गुरुवारी जड वाहनांना प्रवेश बंदी न घातल्याने धोका वाढत असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, “गुरुवारी जड वाहनांवर तात्काळ बंदी घालावी आणि शहरातील सर्व अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी. अन्यथा कोणत्याही अपघातास प्रशासन जबाबदार राहील.” तसेच, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या काही दिवसांत रस्ता रोको व प्रशासकीय कार्यालयांवर घेराव आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments