HomeBreaking Newsगॅस सिलेंडर वाटपातील गोंधळावर तोडगा; आता तारखेनुसार वितरण

गॅस सिलेंडर वाटपातील गोंधळावर तोडगा; आता तारखेनुसार वितरण

🔴 गॅस सिलेंडर वाटपातील गोंधळावर तोडगा; आता तारखेनुसार वितरण

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार प्रशासनाची कारवाई; यादीप्रमाणेच मिळणार सिलेंडर

मुल : प्रतिनिधी

मुल शहरातील गॅस सिलेंडर वाटप प्रक्रियेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळावर अखेर प्रशासनाने तोडगा काढला असून आता सिलेंडर वाटप हे बुकिंगच्या तारखेनुसार करण्यात येणार आहे. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार तहसील प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलली आहेत.

मागील काही दिवसांपासून ग्राहकांना ओटीपी येऊनही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या. काही ठिकाणी पैशांच्या जोरावर सिलेंडर मिळाल्याचे आरोप, तर रांगेत तासन्‌तास उभे राहूनही सिलेंडर न मिळाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी तहसील कार्यालयात निवेदने दिली होती.

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदन सादर केले होते. तसेच नागरिकांनी ही समस्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ तहसीलदार मृदुला मोरे यांना आवश्यक सूचना दिल्या.

यानंतर तहसीलदार मोरे यांनी गॅस एजन्सी धारकांची बैठक घेऊन वितरण प्रक्रियेबाबत स्पष्ट नियम ठरवले. त्यानुसार —

सिलेंडर वाटप दर बुधवारी क्रीडा संकुल येथे, तर इतर दिवशी महात्मा फुले आठवडी बाजार येथे होईल.

एजन्सीकडून दररोज सायंकाळी सुमारे 400 ग्राहकांची यादी तहसील कार्यालयात सादर केली जाईल.

पुढील दिवशी याच यादीप्रमाणेच सिलेंडर वाटप होणार आहे.

यादीत नाव नसलेल्या ग्राहकांनी गर्दी करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाटपावेळी ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गोंधळ टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत तहसील कार्यालयाकडून लवकरच अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरासाठी गॅस सिलेंडरचा कोटा वाढवण्याच्या सूचनाही पुरवठा विभागाला दिल्या असून त्यामुळे लवकरच नागरिकांची प्रतीक्षा संपणार असल्याचे संकेत आहेत.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments