“एकच रूम… एकच स्वप्न… आणि चौघींची पोलीस भरतीत दमदार एन्ट्री!”
मूल तालुक्यातील चार जिवलग मैत्रिणींचा जिद्दीचा विजय; चंद्रपूर पोलीस भरतीत इतिहास रचला
दुर्योधन घोंगडे चंद्रपूर : “स्वप्न पाहायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने झटायचं,” या उक्तीला साजेसा आदर्श चंद्रपूर जिल्ह्यातील चार तरुणींनी घालून दिला आहे. मूल तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या या चार जिवलग मैत्रिणींनी एकाच वेळी पोलीस भरतीत यश मिळवत इतिहास रचला आहे.
शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी या चौघी चंद्रपूर येथे एकाच भाड्याच्या खोलीत राहत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही, एकमेकींना आधार देत त्यांनी खडतर प्रवास पार केला.
👮♀️ निवड झालेल्या रणरागिणी:
कु. प्रतीक्षा संजय सोनुले (रा. केळझर)
कु. पूजा रमेश मांदाडे (रा. बेंबाळ)
कु. सुप्रिया राजू बालुगवार (रा. बेंबाळ)
कु. प्रियाली प्रकाश वासेकर (रा. सिंतळा)
पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्ही टप्प्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी गुणवत्ता यादीत (Merit List) स्थान पटकावले.
या यशाचे विशेष म्हणजे, या चौघी एकाच तालुक्यातील असून, एकाच खोलीत राहून, एकाच अभ्यासिकेत अभ्यास करत होत्या आणि आता एकाच वेळी पोलीस दलात रुजू होणार आहेत.
पोलीस भरतीच्या इतिहासात एकाच रूममधील चारही मुलींची निवड होणे ही दुर्मिळ आणि अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
आपल्या जिद्दीच्या जोरावर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या चौघी आज ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.







