युवकांच्या पुढाकारामुळे नांदगावात विसंभा (विसावा स्थळ) बांधकामास सुरुवात
नागरिकांत समाधान व्यक्त
नांदगाव :मूल तालुक्यातील नांदगाव येथे अंत्ययात्रेदरम्यान प्रेताला विसावा मिळावा यासाठी विसंभा (विसावा स्थळ) उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. मात्र या मागणीकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष झाल्याने विषय प्रलंबित राहिला होता.
अखेर नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल पगडपल्लीवार व ग्रामस्थांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत नांदगावकडे निवेदन सादर केले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून सर्व धर्मीय समाजासाठी विसंभा (विसावा स्थळ) बांधकामास मंजुरी दिली. त्यानुसार सदर कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
नांदगाव येथे अंत्ययात्रा नेत असताना विसावा स्थळ नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय, नांदगाव यांच्या वतीने ठराव घेऊन विसंभा मंजूर करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
विसंभा बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांनी निवेदन देणाऱ्या युवकांचे तसेच ग्रामपंचायतीचे आभार मानले असून, या निर्णयामुळे गावातील सामाजिक सोयी-सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडल्याची भावना व्यक्त होत आहे.







