मुल शहराचा विकास करण्यासाठी भाजपाचा नगराध्यक्ष म्हणून येणे गरजेचे
मूल (प्रतिनिधी): मुल नगरपरिषद क्षेत्रातील सुरू असलेल्या स्मार्ट शहर प्रकल्पासह विविध विकासकामांना गती देण्यासाठी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या १ नगराध्यक्ष आणि २० नगरसेवकांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुलच्या मतदारांना केले.
नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शहरातील रामलीला भवन मैदानावर भव्य सभेच्या माध्यमातून झाला. येत्या पाच वर्षांत भाजपच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा जाहीरनामा जाहीर करताना माजी मंत्री व लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.
सभामंडपातील रंगमंचावर भाजपचे उमेदवार, पदाधिकारी, तसेच जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, राम लखिया, संध्याताई गुरनुले, प्रभाकर भोयर, रत्नमाला भोयर, प्रा. किरण कापगते, वंदना आगरकाटे, चंदू मारगोनवार, प्रविण मोहुर्ले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसवर निशाणा साधताना मुनगंटीवार म्हणाले, “काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवारही नाही; त्यांना उमेदवारसुद्धा आमच्याकडूनच घ्यावा लागतो. आम्ही केलेल्या कामातील त्रुटी दाखवून ओरड करण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही ठोस विकासदृष्टिकोन नाही. आरोप करण्यातच त्यांना धन्यता वाटते.”
ते पुढे म्हणाले, “केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. जर नगरपरिषदेतही आमचेच प्रशासन आले, तर विकासाचा हा झंझावात कुणीही रोखू शकणार नाही.”
शेवटी, जनतेने मला जसा आशीर्वाद दिला, तसाच या सर्व २१ उमेदवारांनाही देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी सभेतून केले.







