HomeBreaking News“नगराध्यक्ष तथा नगर सेवक व्हायचंय म्हणणाऱ्यांना खरंच शहराच्या गल्लीबोळांची, झोपडपटीची, समस्यांची आणि...

“नगराध्यक्ष तथा नगर सेवक व्हायचंय म्हणणाऱ्यांना खरंच शहराच्या गल्लीबोळांची, झोपडपटीची, समस्यांची आणि नागरिकांच्या वेदनांची माहिती असेल का?”“

“नगराध्यक्ष, नगर सेवक व्हायचंय म्हणणाऱ्यांना खरंच शहराच्या गल्लीबोळांची, झोपडपटीची, समस्यांची आणि नागरिकांच्या वेदनांची माहिती असेल का?”“

मुल शहरवासीयांना उमेदवारांकरिता सवाल 

 दुर्योधन घोंगडे लोकवाद मूल : आगामी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून शहरातील गल्लीबोळांपासून राजकीय गोट्यांपर्यंत चर्चा तापली आहे. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक पक्षांकडून नगराध्यक्ष तथा नगर सेवक पदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. काही इच्छुक उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांना गाठत आहेत, तर काही अजूनही पक्षाच्या हिरव्या कंदिलाची वाट पाहत आहेत.

मात्र या सगळ्या राजकीय हालचालींच्या दरम्यान शहरात एकच प्रश्न गाजू लागला आहे – “नगराध्यक्ष तथा नगर सेवक व्हायचंय म्हणणाऱ्यांना खरंच शहराच्या गल्लीबोळांची, झोपडपटीची, समस्यांची आणि नागरिकांच्या वेदनांची माहिती असेल का?”

मुल नगर परिषद क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये आजही रस्त्यांची दयनीय अवस्था, अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, नाल्यांची दुर्दशा, सांडपाणी समस्या, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आणि कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा असे एक ना अनेक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. नागरिकांना दररोज नानाविध समस्यांना शहर वासियांना सामोरे जावे लागत असताना मात्र मतांच्या हव्यासात उमेदवार घराघरांत आपली हजेरी लावत असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.

‘जे आज मतांसाठी आमच्या दारात येतात, ते निवडून आल्यावर आमच्याच दाराची पायरी चढतील का?’ असा थेट आणि स्पष्ट सवाल नागरिकांचा आहे.

अनेक उमेदवार निवडणुकीच्या प्रचारात शहराच्या विकासाचा नारा देतात, काही तर निवडणुकीच्या तोंडावर प्रभागाची कामेही करून देतात, परंतु प्रत्यक्षात शहरातील समस्या ओळखणारे व त्या सोडविण्याची बांधिलकी दाखविणारे नेतृत्व अद्याप दिसत नाही. काही उमेदवारांना स्वतःच्या प्रभागाबाहेरील भागांची नावेही माहित नसल्याची जोरदार चर्चा आता नागरिकांत जोर धरू लागली आहे. तर काही सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिक आता मतदारांना आवाहन करत आहेत की, ‘ फक्त पक्षाचे चिन्ह पाहून नव्हे, तर उमेदवाराला शहराच्या प्रत्येक गल्लीतील वास्तवाची माहिती आहे का, हे पाहून मतदान करा. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या तथा नगर सेवक पदाच्या उमेदवारापुढे आता मोठे आव्हान उभे ठाकले असल्याचे दिसते आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ  आश्वासनं नव्हे, तर कृतीशील नेतृत्वाची गरज असल्याचेही नागरिकांचे मत आहे. मुल शहराच्या अडचणी समजून घेणारा, आपल्या शहराच्या विकासाकरिता वरिष्ठ पातळीवरून निधी घेवून आणणारा, सुशिक्षित, गुणवंत, नीतिवंत,  असा शहराच्या विकासाची दिशा ठरवणारा आणि प्रशासनाशी समन्वय साधणारा उमेदवारच खरी बदलाची ओळख ठरू शकतो, अशी भावना शहरात व्यक्त होत असताना दिसत आहे.

नगर परिषद निवडणुकीचे रणांगण आता तापले असून, पक्षीय समीकरणे बदलत आहेत.मूलच्या गल्लीबोळांचा झोपडपटींचा हक्काच्या निवासाचा ठाव घेणारा नगर सेवक तथा नगराध्यक्ष  पुढे येणार का, की फक्त निवडणूक संपेपर्यंतच शहराची आठवण ठेवणारे नेते पुन्हा रंगमंचावर येतात? याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments