सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्यात गेल्या काही वर्षांपासून मनुष्य–वाघ संघर्ष तीव्र होत चालला आहे. जंगलांनी वेढलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांचे आयुष्य अक्षरशः मृत्यूच्या सावलीत गेले आहे. रोज नव्या हल्ल्यांच्या घटना, शेतात जाण्याची भीती, रात्री बाहेर पडण्याचा धाक—ग्रामीणांचे जीवन संकटमय झाले आहे.
वन विभाग आणि प्रशासनाकडून ‘वाघ संवर्धन’ला महत्त्व दिले जाते, लाखो–कोट्यवधींचे प्रकल्प राबवले जातात; मात्र गावांमध्ये राहणाऱ्या माणसांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना मात्र नगण्य आहेत, ही जनतेची मोठी तक्रार.
स्थानिकांचे म्हणणे स्पष्ट आहे—
👉 “वाघ मारला तर लाखोची किंमत; पण माणूस मेलाच तर मिळतात फक्त कागदी आश्वासने. आमच्या जीवाची किंमत सरकारला नाही का?”
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. काहींच्या हात-पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. भर दिवसा शेतात काम करणाऱ्यांवर किंवा जंगललगतच्या गावात फिरणाऱ्या लोकांवर हल्ले झाल्याने भीतीचे वातावरण दाटले आहे.
दरम्यान, वन विभागाकडून ‘कॅमेरा ट्रॅप’, ‘पिंजरे’ आणि ‘पथक’ यांची व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात येते; परंतु हल्ले थांबण्याऐवजी वाढतच आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की—
👉 “वाघ जिवंत राहावा हे आम्हालाही मान्य. पण आमचा माणूस जिवंत राहावा हे सरकारला कधी कळणार?”
ग्रामीण भागात शोककळा पसरलेली असताना मदत–भरपाई, पुनर्वसन, सुरक्षितता व्यवस्था या सर्व बाबींमध्ये मोठी तफावत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे.
जंगलाचे रक्षण महत्त्वाचेच; पण मानवी जीवनाचे रक्षण त्याहून महत्त्वाचे—ही मागणी आता आंदोलने, ग्रामसभांमध्ये आणि नागरिकांच्या संतापातून स्पष्टपणे दिसू लागली आहे.