*सिंदेवाही तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.*
*ग्राहक संरक्षण अधिनियमाची व्याप्ती आता अनुचित व्यापारी प्रथेला अंकुश लावण्यात समर्थ:-दीपक देशपांडे.*
*ग्राहकांनी आपल्या अधिकारांप्रती जागरुक होणे काळाची गरज:-संदीप पानमंद तहसीलदार सिंदेवाही.*
सिंदेवाही प्रतिनिधी
२४डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नुकताच सिंदेवाही येथील प्रशासकीय भवन सभागृहात संदीप पानमंद तहसीलदार सिंदेवाही यांचे अध्यक्षतेखाली ग्राहक पंचायत मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, अशोक मैदमवार उपाध्यक्ष ,रमेश डांगरे सचिव, डॉ आनंदराव कुळे कार्य.सदस्य आणि अनिल कंठिवार कार्य.सदस्य यांचे उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सौ.कविता जावके आणि सौ.सुनिता येनुकवार यांनी ग्राहक गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली, अतिथींच्या स्वागताने कार्यक्रम सुरु झाला, श्री .लोखंडे, पुरवठा निरीक्षक यांनी सुत्रसंचालन केले.
आपल्या प्रास्ताविकात अशोक मैदमवार यांनी ग्राहक म्हणजे काय?, ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याची गरज याबाबत आपले विचार व्यक्त केले व या कार्यक्रमाचे आयोजनाची आवश्यकता स्पष्ट केली, डॉ आनंदराव कुळे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणूक प्रकारांची यादिच पुढे ठेवली आणि बचावासाठी काय करणे गरजेचे आहे तेही विशद केले .
रमेश डांगरे यांनी ग्राहक म्हणजे काय, ग्राहक संरक्षण अधिनियमाची पार्श्वभूमी आणि आजची व्याप्ती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणूक प्रकारांची माहिती देताना फसवणूक टाळण्यासाठी आपण काय करू शकतो हे सहजसुलभ शब्दात पटवून दिले.
दीपक देशपांडे यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून ग्राहक जागृती आणि ग्राहक दिनानिमित्त अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची आवश्यकता कां भासते आहे याचे विवेचन करताना ग्राहक संरक्षण अधिनियमाची व्याप्ती आता अनुचित व्यापारी प्रथेला अंकुश लावण्यात समर्थ ठरत असून आपण ग्राहक म्हणून प्राप्त अधिकार समजून घेऊन खरेदीविक्री व्यवहार करण्याची आवश्यकता आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि राशन धान्य दुकानदार म्हणून सावधगिरी बाळगण्याची गरज कां आहे हेही स्पष्ट करीत कोणता ग्राहक कधी कुठे कशी तक्रार दाखल करेल आणि तुमच्यावर कार्यवाही होईल हे सांगता येत नाही एवढी या कायद्याची व्याप्ती वाढली आहे , आणि म्हणूनच सावध राहूनच व्यवहार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.आपण एका ठिकाणी दूकानदार असाल परंतू ९९ठिकाणी ग्राहक आहात हे विसरून चालणार नाही हेही यानिमित्ताने स्पष्ट करीत फसवणूक कुठेही होऊ शकते , त्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
शासकीय कार्यक्रम म्हणजे पुढे राशन दुकानदार असणारच हे ठरलेलेच आहे परंतू हे असे कार्यक्रम त्यांचे मुळ उद्दिष्ट गाठायचे असेल तर जनतेच्या दरबारात जनतेच्या हितासाठी घेण्याची सुचनाही यानिमित्ताने संबंधित यंत्रणेला करायला देशपांडे विसरले नाहीत.
संदीप पानमंद तहसीलदार सिंदेवाही यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राहकांनी आपल्या अधिकारांप्रती जागरुक होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आणि उपस्थित मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्यासोबत इतरही आपल्या संपर्कात येणाऱ्या ग्राहकांना करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य हे स्पृहणीय व स्तुत्य असल्याचे स्पष्ट करीत आज सेवाभावाने असे कार्य कुणी करत नाही मात्र ग्राहक हितासाठी ग्राहक पंचायत मूल तालुका शाखेचे करावे तेवढे कौतुक थोडेच असणार आहे त्यामुळे त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण सगळ्यांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे मत संदीप पानमंद तहसीलदार सिंदेवाही यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला राशन दुकानदार , शेतकरी, ग्राहक, महिला,व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते







