“सुट्ट्यांमध्येही कुलूपबंद तलाव; विद्यार्थ्यांची गैरसोय, प्रशासनावर सवाल”
“मुनगंटीवारांच्या निधीतून उभारलेला तलाव पडला निष्क्रिय; तत्काळ सुरू करण्याची मागणी”
गौतम जीवने मूल, शहरातील नगर परिषदेच्या अखत्यारितील जलतरण तलाव सध्या बंद अवस्थेत असून, एप्रिल-मेच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्येही तो सुरू न केल्याने नागरिक, विद्यार्थी व महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जलतरण संघटनेने याबाबत प्रशासनाला निवेदन देत तलाव तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक आमदार व माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून या जलतरण तलावासाठी निधी मंजूर होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी व्यायामासाठी या तलावाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला. तसेच सिंदेवाही, सावली, पोंभुरणा, गोंडपिपरी आदी परिसरातील खेळाडूही स्पर्धेच्या तयारीसाठी येथे सराव करीत होते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा तलाव पूर्णपणे बंद असून, सुट्ट्यांच्या काळातही त्याचे कुलूप उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तलावाबाबत वारंवार विचारणा करूनही नगर परिषद पदाधिकारी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्य करणाऱ्या जलतरण संघटनेने मुख्याधिकारी संदीप रोडे यांना निवेदन देत तलाव तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नगर परिषदेला जागे करण्यासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना किशोर कापगते, संजय चिंतावार, प्रवीण मोहूर्ले, प्रमोद कोकुलवार, निलेश रायकांठीवार, राजेश व्यास, गौतम जीवने, रज्जू कुरेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
⚠️ स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा
तलाव सुरू करताना स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचीही मागणी संघटनेने केली आहे.
पाण्याची नियमित शुद्धीकरण प्रक्रिया
परिसराची स्वच्छता व देखभाल
प्रशिक्षित लाइफगार्डची नियुक्ती
महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा
या सर्व बाबींची पूर्तता करूनच तलाव सुरू करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.







