जिद्द चिकाटी व मेहनतीने केली खाकी स्वप्नपूर्ती
जिवती प्रतिनिधी : जिवती तालुक्यातील कुंभेझरी एक छोटसं गाव. त्यातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला अजित आई-वडिलांचे मोठमोठे स्वप्न उराशी घेऊन राजुरा शहरात वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाला. पण आता राहायचं कुठे? हा प्रश्न निर्माण झाला. त्याचा प्रवेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या म्हणजेच समाज कल्याण च्या राजुरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात झाला. व त्याच्या जीवनाला वेगळीच दिशा मिळाली. अथक मेहनत, जिद्द, चिकाटी, अभ्यासुवृत्ती व स्वतःवरील असलेल्या विश्वासामुळे *अजित शिवाजी कांबळे* हा तरुण चंद्रपूर जिल्हा पोलीस म्हणून अनु. जाती प्रवर्गातून निवडीस पात्र ठरलाय. त्याला मिळालेले हे यश सहजसाध्य नाही. ते कसे मिळाले याचा हा वृत्तांत.
*वसतिगृह – स्पर्धा परीक्षेची रुजवात*
शिवाजी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना वस्तीगृहात असलेली स्पर्धा परीक्षा पुस्तके, साप्ताहिके व मासिके यांच्या वाचनाची त्याला आवड लागली. त्याने सातत्याने ही वस्तीगृहातील पाच वर्षे अभ्यास व मैदानी सराव यात घालवली. तसेच या काळात वस्तीगृहाचे तत्कालीन गृहपाल श्री योगेश धोडरे सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याच्या सुप्तगुणांना जागृत केले. व स्पर्धा परीक्षांसाठी त्याला खंबीर बनविले. सदर गृहपाल हे स्वतः मेहनत चिकाटी व जिद्दीच्या बळावर अनेक स्पर्धा परीक्षा देऊन आठ पदांवर नोकरीस पात्र झालेले होते. हा त्यांचा, तसेच अनेक महापुरुषांचा, मार्गदर्शकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अजित आज यशस्वी झालाय.
*आर्या अकॅडमी इज द बेस्ट अकॅडमी*
खाकी वर्दीची पहिलेपासूनच आवड असल्याने त्याने महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण आटोपून आपल्याच तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पाटण येथील आर्या दी बेस्ट अकॅडमी येथे प्रवेश घेतला. व ध्येयाकडे वाटचाल सुरू केली. तिथे तो मैदानी सराव व स्पर्धा परीक्षा अभ्यास सातत्याने करीत होता. अथक मेहनत करुन मैदानी कौशल्य प्राप्त केले.
तेथील श्री पवार सर, श्री जाधव सर व इतर मार्गदर्शकांनी त्याचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मैदानी सराव करवून घेतला आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेसाठी त्याला तयार केले.
*यशाने दिली दोनदा हुलकावणी*
यापूर्वीच्या 2024 च्या भरतीमध्ये त्याला अपयश आले होते. अवघ्या दोन गुणांनी त्याचा रिझल्ट गेला होता. तसेच एस. आर. पी. एफ. गट क्र. 17 येथील भरतीत फक्त एक गुण कमी मिळाल्याने त्याला प्रतीक्षा यादीत स्थान मिळाले होते. पण तो खचला नाही. स्वतःला नाउमेद होऊ दिले नाही. उलट आपला अभ्यास व मैदानी सराव पुन्हा वाढविला. जिद्द व चिकाटीने पुन्हा कंबर कसली.
पण कधीकधी नैराश्य येतेच. ‘गावातील एक मुलगी नोकरीवर लागली पण तुला वर्दी मिळाली नाही’ असे गावातील लोक हिणवायचे. त्याच्या घरच्यांना म्हणायचे. याचं त्याला वारंवार दुःख वाटायचं. अशा वेळेस तत्कालीन वस्तीगृह वॉर्डन असलेल्या योगेश धोडरे सरांच्या *ती धडपडीची तीन वर्षे* या जीवनलेखाने व अकॅडमीच्या श्री पवार सर, श्री जाधव सर या मार्गदर्शकांनी त्याच्यात खूप मोठी विजिगिशु इच्छाशक्ती जागृत केली.
केलेल्या चुकांना दूर सारून, आपल्याला काहीही करून यशस्वी व्हायचंच, या विश्वासाने जोमाने तयारी करून हे यश त्याने प्राप्त केलं. त्याची जिद्द, चिकाटी व अथक मेहनत आज त्याला यशवंत बनवून गेली.
*मेहनतीला मिळाली नशिबाची साथ*
यावर्षीच्या भरतीचे गुणफलक लागले. त्यात त्याला अपेक्षेपेक्षा कमीच गुण मिळाले. 122 गुणांसह तीन उमेदवार *सातव्या* क्रमांकासाठी होते. त्याची पुन्हा धाकधूक वाढू लागली. कारण अनु. जाती प्रवर्गासाठी जागा होत्या सातच. या गुणांच्या निकालापासून तर निवड यादी प्रसिद्ध होईपर्यंत अजितला जेवण गोड लागेना. त्याची झोप सुद्धा उडाली होती. मात्र नशिबाने त्याच्या मेहनतीला साथ दिली. इतर अंतर्गत परावर्तनाने या संवर्गाच्या जागा वाढल्या. निवड यादीत अनु. जाती प्रवर्गातून *आठव्या* क्रमांकावर अजितची पोलीस म्हणून निवड झाली. व त्याचे, त्याच्या आई- वडिलांचे, भाऊ-बहिणींचे खाकीचे स्वप्न सत्यात उतरले. गावातील लोकांना अत्यानंद झाला. त्याचे वस्तीगृह वार्डन यांच्यासाठी तर ही अभिमानाची बाब होती. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री विनोद मोहतुरे साहेब व इतर अनेकांनी त्याच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.







