मार्कंडा देव : शासनाच्या कामकाजाचा कणा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागातील तलाठी कार्यालयच गेल्या दोन महिन्यांपासून अंधारात असल्याचा धक्कादायक प्रकार मार्कंडा देव येथे उघडकीस आला आहे. फक्त १८००/-रु, वीज बिलाचा भरणा न झाल्यामुळे MSEB कडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, या काळात कार्यालयाचे कामकाज नेमके कसे सुरू होते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तलाठी कार्यालयाचे वीज बिल दोन महिन्यांपासून थकीत होते. वारंवार सूचना देऊनही बिल न भरल्याने अखेर वीज वितरण कंपनीने कनेक्शन तोडले. परिणामी, कार्यालय पूर्णपणे अंधारात गेले आहे. यामुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे. 7/12 उतारे, दाखले, विविध शासकीय कागदपत्रे यासाठी येणाऱ्या नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत असून, “वीज नसताना काम कसे चालते?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. काही नागरिकांनी तर, “दोन महिने वीज नसताना कार्यालय चाललेच कसे?” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी वेळेत बिलाचा भरणा का केला नाही? आणि वीज नसताना कार्यालयीन कामकाज कशा पद्धतीने पार पडत होते? याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा तसेच संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.