जाम रैयतवारी येथे महिलांचा मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
आरोग्य शिबिर व सत्कार सोहळा; रोजगार हमी योजनेतील महिलांचा साडी-चोळी देऊन सन्मान
सुभाष घोंगडे लोकवाद पोंभूर्णा : तालुक्यातील जाम रैयतवारी येथे बंडूभाऊ बुरांडे मित्रपरिवार व त्रिवेणी महिला ग्रामसंघ जामखुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा, विविध शासकीय योजनांसंदर्भातील शिबिर, आरोग्य शिबिर व सत्कार सोहळा दि. २५ जानेवारी रोजी जामरैयतवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम होत्या. प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच बंडू बुरांडे, भाजप तालुका अध्यक्ष हरिष ढवस, कृ.उ.बा.स.चे संचालक रवी गेडाम, माजी उपसभापती ज्योती बुरांडे व विनोद देशमुख, वैशाली बोलमवार, पपीता पोलवार, मधुकर टिकले, ईश्वर नैताम, अजय मस्के, सुरेंद्र चिडे, प्रणय गरमडे, सुभाष तेलमासरे, धनलाल भोयर, बंडू बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात महिलांना हळदी-कुंकू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विधवा महिलांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. यावेळी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
मार्गदर्शन करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांचा सामाजिक, आर्थिक व राजकीय सहभाग वाढवून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी संघटनात्मक चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू बुरांडे यांनी केले, संचालन एकता बंडावार यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजीत गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू बुरांडे मित्रपरिवार व त्रिवेणी महिला ग्रामसंघ जामखुर्दच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास परिसरातील महिला भगिनी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







