आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेत ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुचा झळाळता सहभाग
मूल व बल्लारपूरमध्ये सोमवारी जाहीर सभा
मुल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व स्टार प्रचारक, राज्याचे माजी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर मतदारसंघाचे लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन भव्य जाहीर सभांचे आयोजन सोमवार, १ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
या सभांचे विशेष आकर्षण ठरणार आहे ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची प्रमुख उपस्थिती. तिच्या आगमनामुळे युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मूल येथे सायं. ५ वाजता गुजरी चौकात, तर बल्लारपूर येथे सायं. ७ वाजता गांधी चौकात सभा होणार आहेत. दोन्ही ठिकाणी रिंकू राजगुरु नागरिकांशी थेट संवाद साधणार असून प्रेरणादायी संभाषणाची पर्वणी नागरिकांना अनुभवता येणार आहे.
मुनगंटीवार यांचे कार्य, विकास उपक्रम आणि स्थानिक मुद्द्यांवर थेट संवाद साधण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असून मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
जनतेच्या सहभागामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.







