कोनसरी (चामोर्शी) : कोनसरी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला लॉयड मेटल आणि स्थानिक प्रशासनाचा दबाव, दमदाटी आणि मानसिक छळ थांबण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांनी आवाज उठवत चामोर्शी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॉयड मेटलचे अधिकारी, आष्टी पोलीस प्रशासन, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या संगनमताचा मोठा खुलासा करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.
कोनसरी परिसरात लॉयड मेटलची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या मनमानी कारभाराला प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधींचे पाठबळ आहे का, अशी चर्चा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांसमोरच उघडपणे गुंडगिरी, दबाव आणि मनमानी सुरू असतानाही कारवाईचा अभाव प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. त्यामुळे या संगनमताच्या खेळाखाली शेतकऱ्यांचे हक्क चिरडले जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांतून उमटत आहे.
पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी सांगितले होते की—
• जबरीने नोटिसा देणे
• खोटे ग्रामपंचायत ठराव तयार करून कंपनीला जमीन उपलब्ध करून देणे
• पोलीस यंत्रणेला हाताशी धरून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने “सया” घेणे
• शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या संमतीशिवाय पैसे जमा करून व्यवहार पक्का करण्याचा प्रयत्न
या सर्व गंभीर प्रकरणांचा पर्दाफाश शेतकऱ्यांनी केला होता.
मात्र हा खुलासा झाल्यानंतर चारच दिवसात पुन्हा एकदा त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना त्रास देण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आला. लॉयड मेटलला लागून असलेल्या एकाच्या शेतात ना नोटीस, ना परवानगी, ना चर्चा—थेट ट्रक घालून माती टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.
जबाबदारी विचारली असता लॉयड मेटलचे अधिकारी मुजोरीने म्हणाले—
“जे करायचं ते करा… व्हिडिओ व्हायरल करा, आम्हाला काही होत नाही. वरून आदेश आहे.”
इतकेच नव्हे तर शेतमालकाला उघड धमकी देत, त्याच्या समोरच मनमानी सुरू ठेवण्यात आली.
या प्रकारामुळे शेतकरी संतापले असून, मानसिक छळाच्या घटना इतक्या वाढल्या आहेत की कित्येकांना ताण, अटॅक आणि गंभीर आरोग्य बिघाडाला सामोरे जावे लागत आहे. MIDC–लॉयड प्रकल्पामुळे “बळीवर बळी” जात असल्याची शेतकऱ्यांची तीव्र भावना आहे.
या क्षेत्रातील शांतता, शेतकऱ्यांचे हक्क आणि प्रशासनाची विश्वसनीयता—सर्वच धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले असून, या सर्व प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी आणि तात्काळ हस्तक्षेपाची मागणी अधिक तीव्र होत आहे