सस्पेन्स संपला, मुल नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट; भाजप,काँग्रेस,शिवसेना कडून कोण आहे रिंगणात?
मूल प्रतिनिधी लोकवाद :नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरुन गेल्या दहा दिवसांपासून सस्पेन्स कायम होता. हा सस्पेन्स अखेर सोमवारी (दि.१७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाला आहे. मुल नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून प्रा. किरण किशोर कापगते (बोरकर) तर काँग्रेसकडून एकता प्रशांत समर्थ तर शिंदेसेनेकडून भारतीताई राकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता मंगळवारपासून निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर करुन एबीफार्म देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार काही अपेक्षित उमेदवारांना संधी मिळाली तरी काहींची भ्रमनिराशा झाल्याने ऐनवेळी बंडखोरी करीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाकडून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उच्चशिक्षित अभ्यासू व पक्ष निष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रा. किरण किशोर कापगते (बोरकर) यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेस पार्टीकडून एकता प्रशांत समर्थ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे उपसभापती राहिलेले प्रशांत समर्थ यांना पक्षाची उमेदवारी मिळणार नाही यापेक्षेने त्यांनी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांच्या कार्यावर विश्वास ठेवत आ. विजय वडेटीवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करुन सोमवारी काँग्रेस पक्षातून एकता समर्थ यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेचे शिंदे गटाचे चर्चेत असलेल्या भारती राकडे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. तर बसपा, वंचित बहुजन आघाडी कडून in चैताली मद्रिवार आदी पक्षाचे सुद्धा उमेदवारांनीही आपली उमेदवारी दिली आहे. एकंदरीत सर्वच प्रमुख पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले असून भाजपा काँग्रेस शिवसेना पक्षात चुरशीची लढत होणार आहे.







