डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या बौद्ध धम्मानुसार वाटचाल करा – राजकुमार जवादे राष्ट्रीय अध्यक्ष
बुद्धगिरी टेकडी मुल येथे वर्धापन दिन साजरा.
मूल लोकवाद: लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जी बाब एखाद्या धर्म पुस्तकात आहे, म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. तर जी बाब आपल्याला स्वीकारायची आहे, ती विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ, बुद्धीनिष्ठ, बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजेच सर्वांच्या हिताची आहे. या चार कसोट्यांवर खरी उतरत असेल तरच त्याचा स्वीकार केला पाहिजे व हेच आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माचे सार आहे, असे प्रतिपादन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांनी केले.
बौद्ध विकास मंडळातर्फे ४ नोव्हेंबर रोजी आयोजित २१ व्या बुद्धगिरी वर्धापनदिनानिमित्त येथील बुद्धगिरी टेकडीवर समारंभाचे आयोजन केले होते. यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक विनोद निमगडे होते. याप्रसंगी नागपूर येथील समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टीचे व्याख्याते प्रशिक आनंद, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटन सचिव प्रा. डॉ. टी.डी. कोसे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बंडू रामटेके, विषमता निर्मूलन समिती मूलचे अध्यक्ष हिरालाल भडके, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या उषा दुर्गे, संध्या भोसले आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या बौद्ध धम्मानुसारच आमची वाटचाल असायला हवी, असा संदेश धम्मबांधवांना दिला.
पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता श्रध्देय भिक्खु संघवश महाथेरो यांचेहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला 11 वाजता भिक्खु संघाला भोजनदान, 12.30 वाजता शिलग्रहण, पुज्यपठण भिक्खु संघाकडुन करण्यात आले. तिसऱ्या सत्रात शिव, फुले, शाहु, आंबेडकर विचारातुन संदेश देणारा आवाज निळया पाखरांचा या बुध्द-भिम गितांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरूषोत्तम साखरे यांनी केले, संचालन पूजा रामटेके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उषा दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीयतेसाठी शम्मी डोर्लीकर, सुजित खोब्रागडे, निहाल गेडाम, अतुल गोवर्धन, बालु दुधे, काजु खोब्रागडे, हर्षवर्धन दुपारी, दिक्षांत मेश्राम, अंजय रंगारी, प्रयण रायपुरे, छगन रामटेके आदींनी अथक परिश्रम घेतले.







