विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रत्येक फेरीचा निकाल ध्वनी प्रक्षेपणाव्दारे घोषित होणार !
प्रतिनिधि मुल, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अंतर्गंत ७२- बल्लारपूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक दिनांक २०/११/२०२४ रोजी पार पडलेली असून दिनांक २३/११/२०२४ रोजी प्रशासकीय भवन, तळ मजला, उपविभागीय अधिकारी, मूल येथे सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी सुरू होणार आहे. EVM च्या मतमोजणीकरीता १४ टेबल, टपाली मतपत्रिका मोजणीकरीता ७ टेबल तसेच ETPBMS मतमोजणीकरीता २ टेबल असे एकूण २३ टेबल मतमोजणीकरीता लावण्यांत येणार आहे. तसेच EVM च्या मतमोजणी करीता १६ पर्यवेक्षक व १७ सहाय्यक, टपाली मतमोजणी करीता ८ पर्यवेक्षक व १६ सहाय्यक तसेच ETPBMS करीता ८ अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यांत आलेली असून २७ फेरीनिहाय मतमोजणी होणार आहे. तसेच, EVM करीता १८ सुक्ष्म निरिक्षक व टपाली मतपत्रिका ८ सुक्ष्म निरिक्षक यांची नेमणुक करण्यांत आलेली आहे.
मतमोजणी करीता पर्यवेक्षक, सहाय्यक, सुक्ष्म निरिक्षक व इतर कर्मचारी यांना दिनांक २२/११/२०२४ रोजी सविस्तर प्रशिक्षण देण्यांत आलेले असून मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे. मतमोजणी कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता तिन स्तरीय बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रथम संरक्षक उपविभागीय कार्यालयाच्या संरक्षक भिंतीपासून १०० मीटर परिघापासून सुरू होईल, तेथे स्थानिक पोलीस बल तैनात असणार आहे. दुसरे संरक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ असेल, तेथे राज्य सशस्त्र पोलीस तैनात असेल. तसेच तिसरा स्तर इमारतीच्या व्दारापाशी राहणार असून तेथे केंद्रीय सुरक्षा दल तैनात राहणार आहे. सदर मतमोजणीचे ठिकाणी कुणालाही मोबाईल, डिजीटल वॉच इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्य आणण्यास बंदी राहणार आहे. प्राधिकारपत्र असलेल्या माध्यम प्रतिनिधी साठी मिडीया सेलची व्यवस्था केली असून एक अधिकारी तेथे मतमोजणीची अद्यावत माहिती देण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. तर ध्वनी प्रक्षेपणाव्दारे प्रत्येक फेरीचा निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणुक अधिकारी यांचे मार्फत देण्यात आली आहे.







