बसची क्षमता पन्नासची अन् कोंबतात दिडशे विद्यार्थ्यांना
–मानव विकास बस सेवा कुचकामी
-जागा नसल्याने पैदलही करावा लागतो प्रवास
पोंभूर्णा प्रतिनिधी :- शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होण्यासाठी शासनाकडून विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी मोठ्या प्रमाणात बसेसवर खर्च केल्याचे दाखविले जाते.मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांना अपुऱ्या बससेवेचा लाभ मिळत नसल्याने शिक्षण घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.पोंभूर्णा येथील विद्यालयात ज्ञानार्जन करण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांचे अपु-या बसअभावी हाल होत आहेत.परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व परत गावाकडे जाण्याकरिता बसमध्ये बसण्यास जागा मिळत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी गाडीने व कधी कधी पैदल चालून घरी जावे लागत आहे.जे उद्देश विद्यार्थीनीच्या सोयीसाठी करण्यात आले आहे ते पुर्ण कुचकामी ठरत आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासन लाखो रुपये खर्च करून वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे; परंतु विद्यार्थ्यांना आज ही जाण्या-येण्यासाठी खस्ता खावे लागत आहे. ब-याच गावांमध्ये बस जात नाहीत,ज्या ठिकाणी बसेस जातात तेथेही उशीरा जातात व बस आली तरी दाटीवाटीने उभे राहून जावे लागते.विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसेस मध्ये इतर प्रवासी असल्याने बसेस भरलेले असतात.या सर्व अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.
संध्याकाळी पाच वाजताच्या बसमध्ये दिडशे पेक्षा जास्त विद्यार्थी कोंबल्या जाते त्यामुळे काही विद्यार्थ्यांना थांबावे लागते.कधी प्रायव्हेट गाडीने तर कधी पाच ते दहा किमी पैदल प्रवास करावा लागतो.पोंभूर्णा तालुका जंगलाने व्यापलेला आहे.यात वाघ व हिंस्त्र प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.अश्या भितीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना फक्त बस न मिळाल्याने जीव मुठीत घेऊन पैदल प्रवास घरी जावे लागते.विद्यार्थ्यांना अपु-या बसमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत असून, विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न पालकवर्गातून विचारला जात आहे.परिवहन महामंडळाने बसची संख्या व विद्यार्थ्यांसाठी बसच्या फे-या वाढवाव्यात.अशी मागणी पालकवर्गासह विद्यार्थी,विद्यार्थ्यीनी यांनी केली आहे.
पोंभूर्णा येथे आयटीआय,विद्यालय,महाविद्यालय, सायन्स कॉलेज,काॅमर्स कॉलेज आदी शिक्षणाच्या सुविधा आहेत.पोंभूर्ण्याला शिक्षणासाठी सातारा तुकूम, सातारा भोसले, सातारा कोमटी,आंबेधानोरा,उमरी पोतदार,घनोटी,
कसरगट्टा,बोर्डा बोरकर,बोर्डा झुल्लुरवार, डोंगर हळदी,चेक आष्टा,वेळवा,चिंतलधाबा,आष्टा,सोनापूर, थेरगाव,फुटाणा, नवेगाव मोरे,पिपरी देशपांडे, घोसरी,देवाडा बुज, जुनगाव,चेक ठाणेवासना आदी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पोंभूर्ण्यात येत असतात.
शाळेत ये जा करण्यासाठी चेक आष्ट्याच्या फाट्यावर आम्हाला उतरावे लागते.तिथून आम्ही मुली दोन किमी अंतर पैदल चालत गावाला जावे लागते.बाजुने जंगल आहे.वाघ डुक्कर अस्वलाचे या भागात आहे.जीव मुठीत घेऊन आम्हाला प्रवास करावा लागतो.त्यामुळे गावातून एसटी बसची व्यवस्था करण्यात यावी.
– तनिशा अरविंद बोंडे, विद्यार्थीनी,चेक आष्टा—-
बरेचदा बसमध्ये शंभरेक प्रवासी व विद्यार्थी कोंबल्या जातात.नेहमीच उभे राहुन प्रवास करावा लागतो.कधी कधी जागाच भेटत नाही.त्यामुळे पैदलच पाच किमी पायदळी जावे लागते.त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी व प्रवाश्यांसाठी वेगवेगळ्या बस सोडण्यात यावे व बस फेऱ्या वाढविण्यात यावे.
-हर्षु बाळकृष्ण गद्देकार, विद्यार्थीनी,कसरगट्टा







