गडचिरोली – महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांकडून पसरवण्यात येत असलेल्या कथित “फेक नरेटीव्ह”ला उत्तर देण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, राजेश ठाकुर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना संसद व विधानसभांमध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे दर्शवले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याची टीका करण्यात आली. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आरक्षण अत्यावश्यक असून, त्याशिवाय त्यांचे प्रतिनिधित्व वाढू शकत नाही, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तसेच, 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची तात्काळ व प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. या मुद्द्यावर राजकीय फायदा घेण्याऐवजी सरकारने पारदर्शक व ठोस भूमिका घ्यावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.