HomeBreaking Newsमूलमध्ये गॅस वितरणात गोंधळाचा कळस; ग्राहकांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन – ग्राहक...

मूलमध्ये गॅस वितरणात गोंधळाचा कळस; ग्राहकांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन – ग्राहक संघटनेचा इशारा

मूलमध्ये गॅस वितरणात गोंधळाचा कळस; ग्राहकांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन – ग्राहक संघटनेचा इशारा

घरपोच सेवा नाही तर २९ रुपये परत द्या; प्रशासनालाही घेतले धारेवर

मूल (प्रतिनिधी):

मूल शहरातील गॅस सिलेंडर वितरण व्यवस्थेतील बेकायदेशीर गोंधळ आणि ग्राहकांची सुरू असलेली पिळवणूक आता उघडकीस आली असून, जागृत ग्राहक राजा संघटनेने यावर तीव्र संताप व्यक्त करत थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना एजन्सीसमोर तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत, तरीही वेळेवर सिलेंडर मिळत नाही. ही सेवा नसून सरळसरळ ग्राहकांची लूट आहे.”

मागील आठवड्यात उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्याशी झालेल्या बैठकीत हा संपूर्ण प्रकार समोर ठेवण्यात आला होता. त्यावेळी घरपोच वितरण तात्काळ सुरू करण्याचे आणि सिलेंडर वाटप क्रमांकानुसार पारदर्शक पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे काही स्थानिक राजकीय मंडळी वितरण प्रक्रियेत हस्तक्षेप करून स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. “गॅस एजन्सी ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. ग्राहकांना मुद्दाम एजन्सीभोवती फिरवून मानसिक व आर्थिक त्रास दिला जात आहे,” असा थेट आरोप देशपांडे यांनी केला.

संघटनेने स्पष्ट केले की, घरपोच सेवा न दिल्यास आणि ग्राहकाने स्वतः सिलेंडर नेल्यास २९ रुपये वाहतूक खर्च परत देणे एजन्सीवर बंधनकारक आहे. हा ग्राहकांचा कायदेशीर हक्क असून, तो नाकारल्यास ती उघड फसवणूक ठरेल, असा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात घरपोच वितरणाचे आदेश दिल्याचे नमूद असूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

“आता ग्राहकांनी गप्प बसू नये. घरपोच सिलेंडर मिळालाच पाहिजे किंवा २९ रुपये परत मिळालेच पाहिजेत, यासाठी ठाम भूमिका घ्या. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा थेट इशारा संघटनेने दिला आहे.

तसेच, मूल येथील जुनी गॅस एजन्सी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सध्याची व्यवस्था सुधारली नाही तर हा मुद्दा अधिक तीव्र होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

घोषवाक्य:

🔥 “जागो ग्राहक जागो… ग्राहक राजा जागा हो, अन्यायाविरोधात उभा रहा!”

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments