Homeगडचिरोलीसार्वजनिक शिव - भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने “ सम्राट अशोक-फुले-आंबेडकर-तुकडोजी...

सार्वजनिक शिव – भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने “ सम्राट अशोक-फुले-आंबेडकर-तुकडोजी महाराज संयुक्त जयंती : प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात संपन्न”

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

जोतिराव फुले यांचे विचार ग्रामशीच्या सिद्धांतात समजून घेणे काळाची गरज.- प्रा.डॉ. गजानन कोर्तलवार

 

चामोर्शी :(11 एप्रिल)
कोणत्याही काळातील भांडवलशाही सत्तेला समाजवादी विचार परवडणारे नसतात . म्हणून ते सत्तेचा हात धरून शोषितांना भ्रमात ठेवतात. ते भ्रम दूर करण्याचे काम विविध ग्रंथ लेखनातून जोतिराव फुले यांनी केले. धर्म , संस्कृती, शिक्षण आणि साहित्य या सर्व क्षेत्रात पर्याय त्यांनी 19 व्या शतकात दिला. असे पर्यायी धुरीनत्व प्रत्येक काळात निर्माण होणे गरजेचे आहे. ते केवळ शिक्षणातून निर्माण झालेल्या जैविक बुद्धिवंताकडून अपेक्षित आहे. हा अँटोनिओ ग्रामशीचा सिद्धांत सध्याच्या भारतात आपण नव्याने समजून घेतला पाहिजे. असे आवाहन प्रा.डॉ. गजानन कोर्तलवार यांनी केले.
सार्वजनिक शिव – भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रबोधनात्मक सार्वजनिक संयुक्त जयंती महोत्सव नगर पंचायत प्रांगण , बाजार चौक चामोर्शी येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी
केवळ मतदाता म्हणून हक्क मिळाला . ते पर्याप्त नसून आपण न्याय हक्काचे निर्माते होणे गरजेचे असल्याचेहीअभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केले.
प्रियदर्शी सम्राट अशोक, राष्ट्रपिता जोतीबा फुले , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. गजानन कोर्तलवार , उद्घाटक नगराध्यक्ष जयश्रीताई वायलालवार , विशेष अतिथी चामोर्शी पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक दीपक डोंब व अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हाटकर उपस्थित होते .कार्यक्रमाच्या उद्घाटिका नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांनी “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी “
या ग्रामगीतेतील ओळीतून मुलांवर संस्कार करून त्यांना घडविणारी आईच खरी समाज व राष्ट्राचा उद्धार करणारी असून त्यातूनच नागरिक तयार होतात , असे सांगत कार्यक्रम स्थळी परिवर्तनवादी साहित्य उपलब्ध आहेत . ती प्रत्येकांनी घेऊन वाचन करण्याची गरज व्यक्त केली. पोलिस निरीक्षक दिपक डोंब यांनी कार्यक्रमात व्यक्त केलेले विचार दैनंदिन जीवनात अवलंब करण्याचा सल्ला दिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हाटकर यांनी अध्यक्षीय भाषणातूंन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी संविधान निर्माण केले . त्यामुळेच देश व राज्य चालत असून संविधानामुळे
नागरिकांना सर्व मूलभूत अधिकार मिळाले आणि विविध जाती – धर्मात विभागलेल्या भारतीय समाजाला एकसंघ करण्याचे काम भारतीय संविधानाने केल्याचे अधोरेखित केले.
प्रास्ताविक मधून गुरुदेव सातपुते यांनी संयुक्त जयंती साजरी करण्याचे उद्देश स्पष्ट केले .सुरेख असे संचालन डिम्पल माळवे यांनी केले . तर आभार शिवराम मोंगरकर यांनी व्यक्त केले .या महोत्सवाला चामोर्शी नगरातील व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments