Homeगडचिरोलीवृत्तपत्र उद्योग वाचवा! 'व्हॉईस ऑफ मीडिया'चे गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना साकडे

वृत्तपत्र उद्योग वाचवा! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना साकडे

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

                       प्रेस नोट

गडचिरोली : लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा वृत्तपत्र उद्योग सध्या वाढत्या महागाईमुळे आणि आर्थिक संकटामुळे अस्तित्वाच्या लढाईत अडकला आहे. कागद, मुद्रण साहित्य आणि विजेच्या दरात झालेल्या भरमसाठ वाढीमुळे राज्यातील वृत्तपत्रे विशेषतः लघु व मध्यम स्वरूपाची प्रकाशने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने आज, ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सन २०१९ पासून कागद आणि मुद्रण साहित्याच्या दरात तब्बल १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, शासनाच्या जाहिरात दरात त्या तुलनेत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. यामुळे वृत्तपत्र चालवणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाले असून, लघु व मध्यम वृत्तपत्रांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने शासनासमोर खालील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत: जाहिरात दरात वाढ: शासकीय जाहिरात दरात किमान १५०% वाढ तातडीने लागू करावी. नियतकालिक देयके: जाहिरातींची बिले ३० दिवसांच्या आत अदा करावीत, अन्यथा विलंब झाल्यास त्यावर व्याज द्यावे. समान संधी: लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी मिळायला हवी. पत्रकार कल्याण: १० वर्षे सेवा असलेल्या पत्रकारांना ‘अधिस्वीकृती’ (Accreditation) द्यावी आणि २० वर्षे सेवा व ५५ वर्षे पूर्ण झालेल्या पत्रकारांना ‘पेन्शन’ योजना लागू करावी. ई-टेंडर: सर्व शासकीय ई-टेंडर आणि जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करण्याची सक्ती असावी.
निवेदन देताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे विदर्भ विभाग तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, राज्य कार्यकारिणी सदस्य (साप्ताहिक विंग) मुकुंद जोशी, रेखा वंजारी, संगीता विजयकर, तिलोत्तमा हाजरा, प्रकाश ताकसांडे, शहराध्यक्ष सुरज हजारे, शहर सरचिटणीस निलेश सातपुते आणि हितेश ठेंगे प्रामुख्याने उपस्थित होते.
“वृत्तपत्र उद्योग मजबूत राहिला तरच लोकशाही आणि जनतेच्या अधिकारांचे रक्षण होऊ शकते,” अशी भावना यावेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली. आता राज्य सरकार या ऐतिहासिक संकटात सापडलेल्या उद्योगाला काय दिलासा देते, याकडे संपूर्ण माध्यमांचे लक्ष लागले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments