बाथरूममधील हिटरचा शॉक; तरुण उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली प्रतिनिधी :
शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, बाथरूममध्ये पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हिटरमुळे विद्युत शॉक बसून एका तरुण उद्योजकाचा मृत्यू झाला आहे. जयंत मनोहर भांडेकर (वय २४, रा. गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते शहरातील प्रसिद्ध *‘जयंत आटा चक्की’*चे संचालक म्हणून ओळखले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत भांडेकर यांनी शुक्रवारी नेहमीप्रमाणे दिवसभराचा व्यवसाय आटोपून रात्री घरी परतल्यानंतर आंघोळीसाठी बाथरूममध्ये प्रवेश केला. यावेळी पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हिटरमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार शॉक बसला. यात ते बाथरूममध्येच कोसळले.
बराच वेळ उलटूनही ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. दरवाजा उघडून पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
जयंत भांडेकर हे हसतमुख, मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावामुळे परिसरात सर्वांच्या परिचयाचे होते. अल्पावधीतच त्यांनी आपल्या व्यवसायातून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे भांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गडचिरोली शहरात शोककळा पसरली आहे.
आज (शनिवार) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका उमद्या व होतकरू तरुणाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
⚠️ विद्युत उपकरण वापरताना घ्या विशेष काळजी
या घटनेने घरगुती विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते बाथरूममध्ये गिझर/हिटर वापरताना विशेष काळजी घ्यावी
आंघोळीपूर्वी उपकरण बंद करणे आवश्यक
योग्य ‘अर्थिंग’ व MCB/ELCB ची तपासणी करावी
ओल्या हातांनी स्विचला स्पर्श टाळावा
तांत्रिक बिघाड असल्यास त्वरित दुरुस्ती करावी
क्षणिक निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.







