सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नागपूर विभागाचे दोन दिवसीय विभागीय अधिवेशन शनिवार (२८ मार्च) व रविवार (२९ मार्च २०२६) रोजी राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज येथे आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
पूर्वी विदर्भापुरती मर्यादित असलेली शिक्षक परिषद आता राज्यव्यापी संघटना म्हणून कार्यरत असून “शिक्षकहित, शिक्षणहित व राष्ट्रहित” हे तिचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जुनी पेन्शन योजना, शिक्षक पात्रता परीक्षा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, तक्रार निवारण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील शाळांना भेटी देऊन शिक्षकांना निमंत्रण देण्यात आले आहे. शिक्षकांना त्यांच्या समस्या, अडचणी व प्रश्न लेखी स्वरूपात मांडण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यावर अधिवेशनात सखोल विचारमंथन होणार आहे.
शिक्षक परिषदेने यापूर्वी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी निवेदने, आंदोलने व पाठपुरावा केला आहे. माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनीही जुनी पेन्शनसह अनेक प्रश्न सभागृहात उपस्थित केले होते. काही मुद्द्यांवर यश मिळाले असून अनेक प्रश्नांवर अजूनही लढा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात खाजगी माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासंदर्भात सुधारणा, विमा संरक्षण तसेच निवृत्ती वेतन प्रकरणे मार्गी लावण्यात परिषदेला यश आले आहे. निवृत्ती वेतन वेळेत न मिळाल्यास दंड व व्याजाची तरतूद करण्याची मागणीही यावेळी पुढे येण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनात शासन, प्रशासन, शिक्षक व जनप्रतिनिधी सहभागी होणार असून महत्त्वाचे ठराव संमत करून ते राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. शिक्षक-शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर विभागातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचारमंथनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.