चांभार्डा येथे वाघ-बिबट्याची झुंज; जखमी बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, चौघे जखमी — काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची रुग्णालयात जाऊन जखमींची भेट
गडचिरोली: तालुक्यातील चांभार्डा येथे आज सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास वाघ आणि बिबट्याच्या भीषण झुंजीनंतर गंभीर घटना घडली. झुंजीत जखमी झालेल्या बिबट्याने अचानक नागरिकांवर हल्ला केल्याने चार जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या हल्ल्यात विलास ठाकरे, रेखा मडावी आणि लुमाजी मुनघाटे हे गंभीर जखमी झाले असून लीलाधर मुनघाटे हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी वाढत्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याची टीका करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
चांभार्डा व परिसरात विशेष पथक तैनात करणे, गस्त वाढवणे तसेच जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, संजय सिंगाडे, गौरव येणप्रेडीवार व विवेक बाबणवाडे उपस्थित होते.