देशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक संतुलन बिघडले असून, अलीकडेच एलपीजी गॅसच्या दरात सुमारे 60 रुपयांची वाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर NSUI गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन करण्यात आले.
सतत वाढणाऱ्या गॅस दरांमुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले आहे. याचा फटका केवळ गृहिणींनाच नव्हे, तर हॉटेल व्यवसायिक, लहान दुकानदार आणि विद्यार्थी वर्गालाही बसत आहे. विशेष म्हणजे घरगुती तसेच व्यावसायिक गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील अनेक नाश्त्याची दुकाने बंद पडलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या संदर्भात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून, स्थानिक पत्रकारांनीही हा मुद्दा वारंवार मांडलेला आहे. तरीदेखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात आली.
या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. “नरेंद्र गायब, देशातून सिलेंडर गायब” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी मा. हार्दिप सिंग पुरी, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री, भारत सरकार यांना जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्याची तसेच घरगुती व व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. नितीन गावडे यांनाही निवेदन सादर करण्यात आले.
NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे म्हणाले, “सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी ही गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी.”
याप्रसंगी NSUI सचिव चिंतामणी फुलझेले, NSUI उपाध्यक्ष तेजस कोंडेकर, अभिषेक चौधरी, तालुकाध्यक्ष कुषभ मेषाखेत्री, अमित किनेकर, गितेश तेल्कापल्लीवार, खुशाल हूईके, कुशाल शिवणकर, अंकित कुकुडकर, अरविंद मडावी, युवराज तलांडी, शांताराम दूर्वा, प्रशांत गोटा तसेच NSUI चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.