पेट्रोल पंपांवर मूलभूत सुविधांचा अभाव; उन्हाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय
मूल / प्रतिनिधी ; तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी–सुविधांचा अभाव असल्याचे चित्र समोर येत आहे. पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय आणि वाहनांसाठी हवा भरण्याची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असून प्रवासादरम्यान पिण्याच्या पाण्याची गरज अधिक भासत आहे. मात्र काही पेट्रोल पंपांवर पाण्याची व्यवस्था नसल्याने लहान बालके, गरोदर महिला, भगिनी व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
नियमांनुसार पेट्रोल पंपांवर नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय, हवा भरण्याची सुविधा, प्राथमिक उपचार पेटी व तक्रार नोंदवही उपलब्ध असणे बंधनकारक आहे. या सुविधा मोफत उपलब्ध करून देणे अपेक्षित असतानाही काही ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पेट्रोल पंपांची तपासणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.







