सोनू वाळके,उपसंपादक,लोकवाद न्युज.
प्रशासनाचा मनमानी कारभार उघड.
चामोर्शी/गडचिरोली :
चामोर्शी तालुक्यातील मुधोली व जयरामपूर परिसरात प्रस्तावित लोहखनिज उद्योग प्रकल्पासाठी जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले असून, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया राबविल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचा भूसंपादनाला ठाम विरोध असताना देखील प्रशासनाकडून जमीन मोजणी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उद्योग प्रकल्पासाठी सुपीक शेतीजमीन अधिग्रहित करण्याच्या निर्णयामुळे अनेक शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या जमिनीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शासनाने त्यांना विश्वासात घेऊन संवाद साधणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या भावना व मागण्या दुर्लक्षित करून जबरदस्तीने जमीन मोजणी सुरू केल्याने त्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. सुपीक जमिनी कवडीमोल दरात अधिग्रहित करून शेतकऱ्यांना भूमिहीन केले जात असल्याचा आरोपही आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, जमीन मोजणी सुरू असताना काही शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला विरोध दर्शविला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चामोर्शीचे तहसीलदार घोरुडे तसेच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या घडामोडींमुळे मुधोली–जयरामपूर परिसरात शेतकरी व प्रशासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांनी आपला लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.