सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी :
तालुक्यातील कोणसरी येथे सुरू असलेल्या लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या लोहप्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया ११ मार्चपासून राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून येणापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील मुधोली चक नं. २, पारडी देव रिठ आणि जयरामपूर येथे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलने, निदर्शने किंवा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अविश्यात पंडा यांनी १० मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत येणापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार येणापूर ते जयरामपूर या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. मात्र प्रवासी बसेस तसेच पाणीपुरवठा, महावितरण, दूरसंचार आणि रस्ता दुरुस्ती संदर्भातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
सदर आदेश मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व ११६ अन्वये जारी करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत.