प्रेरणा बौध्द मंडळ, व सावित्री–रमाई महिला मंडळ चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमुर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी; सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा
“शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करत प्रेरणा बौध्द मंडळ, चामोर्शी व सावित्री–रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमुर्ती माता रमाई जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
६ फेब्रुवारी रोजी लुबीनी बुद्ध विहार येथे विविध बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुला-मुलींसाठी खेळ, गीत, तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. “बाबासाहेबांच्या महान कार्यात माता रमाईचे योगदान” या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रमाईंच्या त्याग, संघर्ष आणि कष्टमय जीवनावर प्रभावी विचार मांडले.
७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जयंती सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आयु. अरुणा शाम रामटेके मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मा. आयु. दर्शना बारसागडे मॅडम, तसेच प्रमुख वक्ते मा. आयु. इंदिरा नागदेवत व मा. आयु. जनबंधु मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वक्त्यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनकार्याचा गौरव करत, “रमाई नसत्या तर बाबासाहेबांचे स्वप्न साकार झाले नसते,” असे प्रतिपादन केले. त्यांच्या संघर्षातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमात नृत्य, डान्स, गीत, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध कला प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यागमूर्ती माता रमाई जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या एकजुटीमुळेच हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या सोहळ्यास मोठ्या संख्येने महिला, युवक-युवती व नागरिक उपस्थित होते.