शिव, मुंबई : तरुणाईमध्ये संविधानाची जाणीव आणि लोकशाही मूल्यांची पेरणी करण्याच्या उद्देशाने गुरू नानक महाविद्यालय, शिव येथील राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान महोत्सवा’ला उत्साहात सुरुवात झाली आहे. २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान विविध स्पर्धा आणि उपक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. महोत्सवाची सुरुवात पहिल्याच दिवशी वकृत्व स्पर्धेने झाली. या स्पर्धेस संविधान क्लबचे समन्वयक प्रा. अनिकेत उबाळे यांनी परीक्षक म्हणून उपस्थिती लावली, तर राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुमित खरात यांची विशेष उपस्थिती लाभली. हा महोत्सव आंतरमहाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या सहभागाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संविधानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी वकृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग, संविधानावर PPT सादरीकरण, रिल मेकिंग तसेच प्रश्नोत्तरे स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंदर कौर भाटिया व उपप्राचार्य डॉ. रामराज नादार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संविधानाच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. मुंबईतील विविध नामांकित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.