Homeगडचिरोलीलाहेरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणाची शिवसेनेतर्फे चौकशी

लाहेरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणाची शिवसेनेतर्फे चौकशी

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

सविस्तर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर सक्त कारवाई करावी अन्यथा पालक विद्यार्थी समवेत तीव्र आंदोलन करु संदीप कोरेत यांचा इशारा.

भामरागड : (प्रतिनिधी)

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी अचानक उलटी व मळमळीचा त्रास झाल्याने एकूण 72 विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी, ग्रामीण रुग्णालय भामरागड व उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे दाखल करण्यात आले होते.

दिनांक -29 जानेवारी 2026 रोजी दुपारपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र त्यापैकी  तीन विद्यार्थिनी व तीन विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे उपचार घेत होते. यापैकी दोन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अहेरी येथे संदर्भित (रेफर) करण्यात आल्याची माहिती भामरागड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वडलाकोंडा यांनी दिली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी भामरागड शिवसेना तालुकाध्यक्ष *सुधाकर तिम्मा यांच्या नेतृत्वाखाली व अहेरी विधानसभा प्रमुख *संदीप कोरेत* यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. त्यानंतर शिष्टमंडळाने लाहेरी येथील आरोग्य केंद्रात भेट देऊन संबंधित डॉक्टरांकडून घटनेबाबत माहिती घेतली.
डॉक्टरांनी विषबाधेची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगून अन्ननमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच अन्नसुरक्षा विभागाची पथक आश्रम शाळेत येऊन नमुने गोळा करत असल्याची माहिती देण्यात आली.

यानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ लाहेरी आश्रम शाळेत दाखल झाले. शाळेचे अधीक्षक आजारी असल्याने गृहपालांच्या उपस्थितीत संपूर्ण शाळेची पाहणी करण्यात आली. पाहणीत स्वयंपाकघर व भोजनगृहातील स्वच्छतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना वाटण्यात येणाऱ्या फळभाज्या व फळांवर बुरशी आढळून आली तसेच भोजन परिसरात अस्वच्छता असल्याचे स्पष्ट झाले.

या परिस्थितीवरून विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शिवसेना शिष्टमंडळाने नमूद केले. मात्र विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या दिवशी विद्यार्थ्यांना दिलेल्या जेवणाचे नमुने अन्नसुरक्षा विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल येणे बाकी आहे.

या घटनेवरून तालुक्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेकडे संबंधित निरीक्षक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा स्थानिक नागरिक, पालक व शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments