चामोर्शी/घोट: राष्ट्रीय रोड सेफ्टी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रस्ते अपघात रोखण्यासाठी नवोदय विद्यालय, घोट येथील उपप्राचार्य राजन गजभिये आणि त्यांच्या पत्नी पद्मा गजभिये यांनी सुरु केलेल्या अनोख्या “रिफ्लेक्टर जनजागृती” मोहीमेची परिसरात खास दखल घेण्यात येत आहे. रोड सेफ्टीबाबत प्रशासन आणि पोलीस विविध उपक्रम राबवत असतानाच ग्रामीण भागात अनेक टू-व्हीलरस्वारांकडे टेल लाइट व रिफ्लेक्टरचा अभाव असल्याचे चित्र समोर येत आहे. दुरुस्तीच्या वेळी समोरच्या लाईटवरच लक्ष केंद्रित होते, मात्र मागील टेल लाइट किंवा रिफ्लेक्टर तपासले जात नाहीत—यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रोजेक्टर हेडलॅम्प असलेल्या कार वा ट्रकच्या प्रकाशात टू-व्हीलर चालक दिसेनासा होतो आणि त्यातून गंभीर अपघातांची वेळ येते. गजभिये दांपत्याने असे अनेक प्रसंग प्रत्यक्ष पाहिल्यानंतर हा उपक्रम हाती घेतला. “फक्त छोट्या दुर्लक्षामुळे जीव जायला नको” या भावनेतून त्यांनी स्वतः टू-व्हीलरवर रिफ्लेक्टर लावून व टेल-लाइट तपासणी करून नागरिकांना जागरूक करण्याची मोहीम चालविली. या कार्यामध्ये RTO अधिकारी चोपडे साहेबांचे मार्गदर्शन मिळाल्याचेही राजन गजभिये यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहात राबविलेल्या या स्वतःहून केलेल्या जनजागृतीला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत असून सामाजिक संस्थांनीही दांपत्याच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. लहानसा प्रयत्न — जीव वाचवणारा ठरेल, हा संदेश नवोदय चे उपप्राचार्य राजन गजभियेंच्या उपक्रमातून स्पष्टपणे उमटताना दिसतो.