सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी/मार्कंडा देव::-
गडचिरोली दि. 25 :- विदर्भाचे काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देव येथे महाशिवरात्री निमित्ताने दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
मार्कंडादेव येथील धर्मशाळेत शिवरात्री निमित्त मार्कंडादेव, पळसगाव व चपराळा यात्रेच्या नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पंडा बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपविभागीय अधिकारी एम. अरुण, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, पोलीस व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यात्रेसंदर्भात मार्गदर्शन करताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले, “राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक मार्कंडादेव येथे येतात. त्यामुळे भाविकांना त्रास होणार नाही यासाठी सर्व विभागांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.” लोकप्रतिनिधी व प्रशासनातील समन्वय यात्रेच्या यशासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेत विविध विभागांना आवश्यक सूचना केल्या. यात्रेदरम्यान केंद्रीकृत नियंत्रण कक्ष, सीसीटीव्ही व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त, तात्पुरत्या दुकाने परवान्यांसाठी एक खिडकी योजना, पिण्याचे पाणी व स्वच्छतेची व्यवस्था अशी महत्त्वाची कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले.
आपत्ती व्यवस्थापन, नगर पंचायत व अग्निशमन विभागांमार्फत अग्निसुरक्षा, स्वच्छता व मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यास सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजी तातडीने पूर्ण करण्यास, आरोग्य विभागाला वैद्यकीय पथके, औषधे व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यास सांगितले. तसेच विद्युत, वन, अन्न व औषध, पुरातत्त्व, मंदिर ट्रस्ट, चिचडोह बॅरेज प्रशासन, एस.टी. महामंडळ आदी विभागांना नियंत्रण कक्ष उभारण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान नागरिकांनी यात्रेसंबंधी विविध सूचना मांडल्या असून प्रशासनाकडून त्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे जिल्हाधिकारी व आमदारांनी सांगितले.
प्रस्ताविकाद्वारे तहसीलदार प्रशांत घोरूडे यांनी यात्रेची माहिती सादर केली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.