सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
मार्कंडा देव/चामोर्शी
महाशिवरात्री अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली असतानाच MSRDC च्या अंतर्गत नाले व रस्ते बांधकामाची कामे अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे मुख्य रस्ते ये-जा करण्यासाठी अरुंद झाले असून वाहतूक, दुकाने व व्यवसाय यावर मोठा परिणाम दिसून येत आहे.
शिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी बाहेरगावातून व्यापारी, व्यवसायिक आणि भाविक मोठ्या संख्येने गावात येतात. विशेषतः अनेक व्यापारी 15 दिवस आधीच येऊन आपली दुकाने व स्टॉल्स उभे करतात. परंतु यावर्षी नाल्यापासून उंच रस्ते बांधून ठेवले असल्याने दुकानांसाठी जागा मिळवणे म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत ठरत आहे.
गावकऱ्यांच्या मते रस्ते इतके अरुंद झाले आहेत की वाहनांची आणि पादचारींची ये-जा धोकादायक बनली आहे. शिवाय बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना जागेअभावी व्यवसाय लावण्यास गंभीर अडचणी येत आहेत.
यात अधिक चिंतेची बाब म्हणजे या कामांमध्ये कंत्राटदारांची कथित मुजोरी आणि मनमानी कारभार सुरु असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. वेळापत्रक, मार्गदर्शन, पर्यायी व्यवस्था काहीच नसताना कामे सुरू ठेवली जात असल्याने याला अभय कोण देत आहे? हा प्रश्न गावकऱ्यांमध्ये चांगलाच चर्चेत आहे.
महाशिवरात्रीसारखा मोठा उत्सव काही दिवसांवर असतानाही संबंधित विभागाने पर्यायी रस्ता, स्टॉल नियोजन किंवा वाहतूक व्यवस्था याबाबत कोणतीही मदत न केल्याने व्यापार आणि धार्मिक उत्सवावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गावकऱ्यांची मागणी आहे की MSRDC आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मार्ग सुकर करावा, अन्यथा भाविक आणि व्यापारी दोघेही अडचणीत येणार आहेत.