कुनघाडा (रै.) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ निमित्त स्थानिक विश्वशांती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुनघाडा (रै.) येथे भव्य रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव रस्त्यावरील सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रांच्या माध्यमातून रस्ते अपघाताची कारणे व उपाय मांडले. वक्तृत्व स्पर्धेत ‘रस्ता सुरक्षा-काळाची गरज’ या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी विचार व्यक्त केले, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे वाहतूक चिन्हे व कायद्यांविषयीच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना परिवहन कार्यालयाच्या वतीने शिल्ड (स्मृतीचिन्ह) आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्ते सुरक्षा ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शिस्तबद्ध वाहन चालवल्यास अनेक जीव वाचवता येतात.
या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, अविनाश आबोरे निरीक्षक परिवहन विभाग, किरण शिंदे निरीक्षक परिवहन विभाग, प्राचार्य एस. आर. मेश्राम, पत्रकार उमेश गझलपेल्लीवार, शिक्षक वृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालय प्रशासनाने विशेष सहकार्य केले. रस्ता सुरक्षेची सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.