चामोर्शी —( प्रतिनिधी) विदर्भातील आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या मार्कंडा देवस्थानाला ‘विदर्भाची काशी’ म्हणून विशेष ओळख आहे. याच ऐतिहासिक स्थळाला राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज भेट देत येथील जीर्णोद्धार व सुरू असलेल्या विविध विकासकामांची सखोल पाहणी केली. मुख्य सचिवांनी मंदिर परिसरातील घाट, वाहनतळ, उद्यान, स्वच्छतागृहे, अंतर्गत व बाह्य सौंदर्यीकरण तसेच प्रगतिपथावरील आराखड्यांची माहिती घेतली. या सर्व विकास कामांच्या गुणवत्तेबाबत तसेच वेगाबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांशी चर्चा करत — “मंदिराच्या ऐतिहासिक वारशाला साजेशा, गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण व्हावीत” — अशा स्पष्ट सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्यात विभागीय आयुक्त तथा प्रधान सचिव विजयालक्ष्मी बिदरी, पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक नंदिनी साहू, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, पुरातत्त्व अधीक्षक अरुण मलिक, तसेच सहायक जिल्हाधिकारी एम. अरुण यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य प्रशासनाकडून झालेली ही उच्चस्तरीय पाहणी मार्कंडा विकास आराखड्यात वेग आणणारी ठरण्याची अपेक्षा स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.