सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक उपस्थिती कमी असली तरी CSR (Corporate Social Responsibility) फंडाविषयीचे अज्ञान आणि माहितीचा अभाव अजूनही गंभीर आहे. जिल्ह्यातील नागरिक, प्रशासनातील अनेक अधिकारी आणि सामाजिक संस्थांना CSR फंड कसा मिळवायचा, त्याची कायद्याने असलेली बंधने काय, याबद्दल फारशी माहिती दिली जात नाही—आणि घेतलीही जात नाही.
खरे चित्र असे की, भारताच्या कंपनी कायद्यानुसार जे कॉर्पोरेट सेक्टर मागील तीन आर्थिक वर्षांच्या सरासरी निव्वळ प्रॉफिटच्या आधारावर पात्र ठरतात, त्यांनी सरासरी नफ्याच्या किमान 2% रक्कम CSR अंतर्गत खर्च करणे हे पूर्णपणे कायद्याने अनिवार्य (Compulsory) आहे. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, महिला-सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रात हा निधी वापरायचा असतो.
मात्र गडचिरोलीत उलट चित्र दिसते. पात्र कंपन्या किती, त्यांनी किती खर्च केला, कोणत्या क्षेत्रात केला, याबद्दल सार्वजनिक डेटा तर नाहीच, तसेच जिल्हा प्रशासनाकडून CSR फंडसाठी योग्य प्रस्ताव, मार्गदर्शन किंवा फॉलोअपचा अभावही प्रकर्षाने जाणवतो.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की—
“CSR हा शब्दच जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींना, सामाजिक संघटनांना माहीत नाही. म्हणून विकास प्रकल्पांसाठी सरकारी निधीच्या भिकेवर राहावं लागतं.”
सामाजिक संस्था आणि NGOs यांच्यापर्यंतही CSR फंड पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन, दस्तऐवजांची मदत, प्रोजेक्ट रिपोर्टिंग, ऑडिटिंग याबाबत कोणतीही सरकारी पातळीवरील सहाय्यता नाही. त्यामुळे अनेक योजना कागदावरच मरतात.
दरम्यान, देशभरातील मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या CSR फंडातून शहरं, गावं बदलत आहेत; रुग्णालयं उभं राहत आहेत, शाळा सुधारत आहेत, डिजिटल लॅब्स चालू होत आहेत—पण गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात या निधीचा वापर शून्य ते नगण्य आहे.
प्रश्न असा उभा राहतो की—
CSR फंड कुठे जातो?
गडचिरोलीला त्यातील काही वाटा का मिळत नाही?
जिल्ह्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात?
CSR फंडाचा योग्य वापर झाला असता तर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व महिला सक्षमीकरण क्षेत्रात मोठी उडी घेता आली असती, हे निर्विवाद आहे.
CSR फक्त शब्दरूपी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ नाही, तर ग्रामीण व आदिवासी भागाच्या विकासासाठी एक मोठी संधी आहे. मात्र ती संधी माहितीअभावी आणि उदासीनतेमुळे गडचिरोलीत वाया जाते, ही खरी शोकांतिका