१० लाखांचा मुद्देमाल जप्त; मूल पोलिसांनी केली कारवाई तंबाखूची वाहतूक; तिघांना अटक
के मूल, (ता.प्र.). शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची वाहतूक करण्यात येणार असल्याची गुप्त माहितीवरून मूल पोलिसांनी गोंडपिपरी ते चांदापूर फाटा मार्गावरील पोलिस दुरक्षेत्र बंबाळ येथे नाकाबंदी करीत गोंडपिपरी येथून येत असलेल्या एका संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आल्याने मूल पोलिसांनी तिघांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. ८) रात्री करण्यात आली. वाहन चालक सुरज रमेश हजारे (रा. व्याहाड बुज), साहिल बाबुराव वेस्कळे (रा. व्याहाड बुज.) आणि राहुल पुरूषोत्तम खोब्रागडे (रा. गडचिरोली) असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत. दरम्यान गोंडपिपरीकडून आलेल्या एमएच ३३ / एसी ५२०९ क्रमांकाच्या
वाहनाची तपासणी केली असता वाहनात विविध कंपन्यांचा तंबाखू वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवलेल्या दिसून आल्याने हा संपूर्ण तंबाखू प्रतिबंधित असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी तंबाखूचा माल ताब्यात घेत कारवाई केली.
गोंडपिपरी ते चांदापूर फाटा मार्गावर कारवाई
तंबाखू विक्रीवर प्रतिबंध असताना गैरकायदेशीर ४ लाख १८ हजार ४९० रुपये किंमतीच्या तंबाखूची वाहतूक करणे गुन्हा असल्याचे सिध्द झाल्याने पोलिसांनी तंबाखूची वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या ६ लाख रुपये किमतीच्या वाहनासह तीन आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. ही कारवाई मूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक अमितकुमार आत्राम यांनी केली.







