डोटकुलीतील आमरण उपोषण स्थळाला युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांची भेट
सोनू वाळके लोकवाद चामोर्शी : तालुक्यातील दोटकुली येथील ग्रामस्थांनी रस्ता मोकळा करून देण्याच्या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण स्थळाला युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत संस्थेच्या वतीने यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने अद्यापही कोणतीही दखल घेतलेली नाही, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे.
निवेदनकर्ते श्री. हनाजी कैकाडू शेंन्डे व इतर ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दोटकुली येथील श्री. शिवराम नानाजी ढोबे हे संबंधित रस्त्यावरून ये–जा करण्यास अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना दैनंदिन वाहतुकीसह शेती व अन्य कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या प्रश्नावरून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात संतापाच्या भरात जीवितहानी होण्याची शक्यताही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत, पंचायत समिती चामोर्शी, तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी (एसडीओ) तसेच जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
“दहा दिवसांची मुदत देऊनही रस्ता मोकळा करण्यात आला नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नाही,” अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. तसेच उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या उपोषणावेळी प्रमोद सहारे, नोमाजी सातपुते, जानकीराम पोरते, गंगा शेडमाके, आशिष घेर, गौरव चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.







