नवनियुक्त नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोरकर यांचा पदग्रहण समारंभ संपन्न.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची विशेष उपस्थिती.
लोकवाद प्रतिनिधी गडचिरोली – शहराच्या नवनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ऍड. प्रणोती निंबोरकर यांनी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. यानिमित्त नगर परिषद आवारात आयोजित पदग्रहण समारंभ अत्यंत सुसंस्कृत व उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोरकर यांना सन्मानयुक्त नगराध्यक्ष खुर्ची वर विराजमान केले. या समारंभास माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची विशेष उपस्थिती लाभली.
पदग्रहण समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोरकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करावे, तसेच शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरणारे कार्य घडावे, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नवनियुक्त नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोरकर यांनी आपल्या मनोगतात पदग्रहणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक, प्रशासन, अधिकारी वर्ग तसेच नागरिकांना विश्वासात घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल. शहराच्या प्रगतीसाठी कायदेशीर चौकटीत राहून ठोस व दीर्घकालीन विकासकामे राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या पदग्रहण समारंभास गडचिरोली जिल्हा निरीक्षक आमदार बंटी भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, गोविंद सारडा, सागर निंबोडकर सर्व पक्षाचे विद्यमान नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.







