सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

गडचिरोली | प्रतिनिधी
मौजा कोनसरी येथे प्रस्थापित लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या स्टील प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना खोटी ग्रामसभा भरवून बनावट ठराव मंजूर केल्याचा गंभीर आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी प्रक्रिया संहिता १५४(३) अंतर्गत FIR नोंदवून सखोल तपास करण्याची मागणी थेट पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्याकडे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, दि. ०४ मार्च २०२३ रोजी ग्रामसभा न भरवता ती भरविल्याचा खोटा ठराव तयार करून मंजूर करण्यात आला. या बनावट प्रक्रियेत लॉयड मेटल कंपनीचे कर्मचारी धनेश मोतीराम जुमनाके, रा.लांझेडा, कुमार स्वामी, प्रशांत घोटेकर यांची भूमिका असून, नोटरी केल्याची कबुली संबंधितांनी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी बाधित शेतकऱ्यांनी दि. १९/१२/२०२५ रोजी आष्टी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने न्याय मिळत नसल्याचा आरोप करत, पोलीस अधीक्षकांनी स्वतःहून हस्तक्षेप करून FIR नोंदवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रार अर्जावर परशुराम पोचु कोटरंगे, कुशाब सोमाजी गोडबोले, इंद्रपाल मारोती कावडे, भाऊजी मारोती कावडे, निरंजना एकनाथ अंगठे, मंदाबाई श्यामराव गोडबोले, जयराम लचमा मडावी, सुखदेव पोचना दयरपावर आदी बाधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जमीन अधिग्रहणात पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर
खोटी ग्रामसभा व बनावट ठरावाच्या आरोपांमुळे प्रशासनातील पारदर्शकता, लोकशाही प्रक्रिया व शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आता पोलीस प्रशासन FIR नोंदवून निष्पक्ष तपास करते का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
“पोलीस स्टेशन आष्टी येथे खोटे ग्रामसभा ठराव तयार करून त्याचे नोटरीकरण करणाऱ्या धनेश जुमनाके विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी अर्ज सादर करूनही पोलीस निरीक्षकांनी कोणतीही कारवाई केली नाही. तपासही न करता प्रकरण दुर्लक्षित ठेवल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना अखेर न्यायासाठी थेट पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्याकडे धाव घ्यावी लागली—यातून स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”








