Homeगडचिरोलीचामोर्शीत जिजाऊ–सावित्री–फातिमा शेख संयुक्त जयंती उत्साहात साजरी

चामोर्शीत जिजाऊ–सावित्री–फातिमा शेख संयुक्त जयंती उत्साहात साजरी

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी :- नगरपंचायत चामोर्शी तसेच समस्त जातीय व सामाजिक महिला संघटना, चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांची संयुक्त जयंती सांस्कृतिक भवन, नगरपंचायत बाजार चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शिवमती जयश्रीताई वायलालवार होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवमती राजश्री गोहने व शिवमती अरुणा गोहने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या प्रतिमेला अध्यक्ष व मार्गदर्शकांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

मार्गदर्शक शिवमती राजश्री गोहने यांनी कुटुंबव्यवस्था, बदलते विवाह समारंभ व स्त्रियांची भूमिका या विषयावर आपले विचार मांडले. संयुक्त कुटुंब पद्धतीतील चांगल्या परंपरा हळूहळू लोप पावत असून, विवाह समारंभ हे केवळ मनोरंजनाचे साधन बनत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दुसऱ्या मार्गदर्शक शिवमती अरुणा गोहने यांनी जिजाऊ ते सावित्री माई यांच्या विचारांचा वारसा या विषयावर मार्गदर्शन केले. माँसाहेब जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीतही समाज घडविण्याचे कार्य केले, ते आजच्या समाजात रुजवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा उल्लेख करत समाजपरिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी, स्त्रिया चिकित्सक व जागरूक बनाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा जयश्रीताई वायलालवार यांनी शिक्षित स्त्रियांची जबाबदारी अधोरेखित करत, चामोर्शीतील सर्व समाजातील भगिनींना एकत्र करून हा जयंती उत्सव अधिक प्रभावीपणे साजरा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

कार्यक्रमात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सुमारे ५० महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. शिवमती कविता झाडे व चंद्रकला गोहने यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली, तर कल्पना बहिरेवार मॅडम यांनी सावित्रीबाईंच्या भूमिकेतील एकपात्री नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली.

प्रास्ताविक नगरसेविका प्रेमा आईंचवार यांनी केले. संचालन नागदेवते मॅडम यांनी तर आभार भंडारवार मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायत चामोर्शी, जिजाऊ ब्रिगेड, सावित्री रमाई महिला मंडळ, संताजी स्नेही महिला मंडळ, विविध समाजाच्या महिला संघटना व सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments