HomeBreaking Newsरस्ते नाहीत, सुविधा नाहीत; शासनाच्या उदासीनतेमुळे गडचिरोलीत गर्भवतीचा बळी!

रस्ते नाहीत, सुविधा नाहीत; शासनाच्या उदासीनतेमुळे गडचिरोलीत गर्भवतीचा बळी!

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

विकासाच्या नावावर राजकारण, आरोग्याच्या नावावर शून्य!” लोकप्रतिनिधी चे नक्षलग्रस्त भागात दुर्लक्ष.

गडचिरोली : विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या शासनाच्या दाव्यांना गडचिरोली जिल्ह्यातील वास्तवाने पुन्हा एकदा काळा फासला आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदांडी टोला येथे रस्त्याअभावी २४ वर्षीय गर्भवती आशा कार्यकर्ती संतोष किरंगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्याची वेळ आली असताना साधा रस्ताही उपलब्ध नसल्याने या महिलेने जंगलातील वाटेने सहा किलोमीटर पायी प्रवास केला; मात्र हा प्रवास तिच्यासाठी मृत्यूचा ठरला.
मुख्य रस्त्यापासून पूर्णतः तुटलेल्या गावात राहणाऱ्या संतोष किरंगा या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. १ जानेवारी रोजी प्रसूतीच्या तयारीसाठी त्या पतीसोबत बहिणीच्या घरी जाण्यास निघाल्या. जंगलातून पायी सहा किलोमीटर चालताना तिची प्रकृती गंभीररीत्या खालावली आणि गर्भातच बाळाचा मृत्यू झाला.
२ जानेवारी रोजी सकाळी तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तिला रुग्णवाहिकेद्वारे हेदरी येथील काली अम्माल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला; मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. गर्भातील शिशूचा मृत्यू झाला असून वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच महिलेचाही दुर्दैवी अंत झाला.
या घटनेने पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यातील मूलभूत सुविधा, विशेषतः ग्रामीण आरोग्य व रस्ते व्यवस्थेचे भयावह वास्तव समोर आणले आहे. विकासाच्या नावावर कोट्यवधींच्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या घटनेची जबाबदारी घेणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments