अपघातग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून कुनघाडा–गडचिरोली महामार्गावर संतप्त चक्काजाम आंदोलन
सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली–चामोर्शी राज्य मार्ग क्रमांक ९३५ वरील कुन्घाडा गावाजवळील रस्ता अक्षरशः मृत्यूचा महामार्ग ठरत असून, गेल्या दोन दिवसांत सलग घडलेल्या भीषण अपघातांनी नागरिकांचा संयम सुटला आहे. या अपघातांच्या निषेधार्थ कुन्घाडा ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, आज दुपारी १२ वाजल्यापासून महामार्गावर ठिय्या देत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. अनेक तासांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
अवैध ट्रक पार्किंग आणि बेदरकार वाहनचालना – अपघातांचे मूळ कारण
या परिसरातून सुरजागड माइनिंग प्रकल्पाशी संबंधित जड वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बिनधास्तपणे उभे केलेले ट्रक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि बेदरकार वाहनचालना हीच अपघातांची मुख्य कारणे असल्याचा ठपका आंदोलनकर्त्यांनी ठेवला आहे. “वेगात धावणाऱ्या ट्रकांमुळे सामान्य माणसाचे रस्त्यावर चालणेही धोक्याचे झाले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दोन दिवसांत दोन अपघात, एकाचा मृत्यू
परवाच शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याचा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून जागीच मृत्यू झाला. या घटनेचा धक्का पचवण्याआधीच दुसऱ्याच दिवशी, काल दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास राँग साईडने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अतुल कोशमाशिले हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे.
15 लाख रुपयांच्या भरपाईची ठाम मागणी
सतत होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सुरजागड माइनिंगमध्ये कार्यरत असलेल्या जड वाहनांमुळेच हे बळी जात असल्याचा आरोप केला आहे. माइनिंग कंपनी लॉयर मेटलने मृत व जखमी अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी 15 लाख रुपयांची आर्थिक भरपाई द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. “भरपाई जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त, तरीही संताप कायम
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गडचिरोली व चामोर्शी तहसीलचा मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. मात्र, चार तासांहून अधिक काळ वाहतूक बंद असल्याने वाहनचालक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
दरम्यान, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, केवळ आश्वासन देऊन जबाबदारी झटकली, असा आरोप स्थानिकांनी केल्याने नागरिकांचा रोष आणखी वाढला आहे.
“जनतेचे जीवन स्वस्त झाले का?” – संतप्त सवाल
“सुरजागड माइनिंगच्या नावाखाली गडचिरोलीतील नागरिकांचे जीवन स्वस्त झाले आहे का?” असा जळजळीत सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. पोलीस प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात असले, तरी माइनिंग कंपन्यांच्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे.
प्रशासन आणि माइनिंग कंपनी यांच्यातील चर्चेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, आंदोलन कधी मागे घेतले जाणार, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे