सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
राजस्थानच्या गंगानगरमध्ये महाराष्ट्राचा तिरंगा उंचावला
गडचिरोली | प्रतिनिधी
राजस्थान राज्यातील गंगानगर येथे १९ ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या १४ व्या राष्ट्रीय पॅरा ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या लुब्धा खंडाळकरने नेत्रदीपक कामगिरी करत इतिहास रचला आहे. पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असलेल्या लुब्धाने ४० किलो वजनगटात सुवर्णपदक तर ४६ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
भामरागड तालुक्यातील एका साध्या कुटुंबातून आलेली लुब्धा खंडाळकर ही गेल्या २०२१-२२ शैक्षणिक वर्षापासून नवोदय विद्यालय, घोट येथे शिक्षण घेत आहे. अपंगत्वावर मात करत तिने खेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून आज ती खरी अर्थाने ‘पॅरा योद्धा’ ठरली आहे.
नवोदय विद्यालय समिती व आदित्य मेहता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथे मिळालेल्या वर्षभराच्या कठोर प्रशिक्षणामुळे लुब्धाने ज्युडोसोबतच आर्म रेसलिंगमध्येही उल्लेखनीय यश संपादन केले. याच वर्षी मे महिन्यात दिल्ली येथे झालेल्या एशियन पॅरा आर्म रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने ३५ ते ६० किलो वजनगटात डावा व उजवा हात या दोन्ही गटांत दोन कांस्यपदके जिंकून भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
देशभरातील शेकडो नामांकित खेळाडूंशी सामना करताना लुब्धाने आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर सातत्याने मजल मारली आहे. आता राष्ट्रीय पातळीवरील पैरा ज्युडो स्पर्धेत सुवर्ण व कांस्यपदकांची दुहेरी कमाई करत तिने महाराष्ट्राच्या खेळविश्वात आपले नाव अढळपणे कोरले आहे.
या यशामागे वडील संजय खंडाळकर, नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या ममता लांजेवार, उपप्राचार्य राजन गजभिये, शारीरिक शिक्षक तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. लुब्धाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भामरागड तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.