HomeBreaking Newsचंद्रपूर जिल्हा काँग्रेसमय; नगरपरिषद निवडणुकीत वडेट्टीवारांचा ‘मास्टरस्ट्रोक.’

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसमय; नगरपरिषद निवडणुकीत वडेट्टीवारांचा ‘मास्टरस्ट्रोक.’

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

Oplus_131072
Oplus_131072

चंद्रपूर | लोकवाद न्युज.

चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून, या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जबर धक्का दिला आहे. जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून, एकूण १९ पैकी तब्बल ७ नगरपरिषदांवर काँग्रेसने विजय मिळवत आपला वरचष्मा सिद्ध केला आहे. या साऱ्या राजकीय उलथापालथीचे केंद्रबिंदू ठरले ते विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार—ज्यांनी या निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली.

विशेष म्हणजे भाजपच्या पाच आमदारांच्या मतदारसंघांमध्येच काँग्रेसने बाजी मारली आहे. ब्रह्मपुरी, मूल, नागभीड, घुग्गुस, बल्लारपूर, वरोरा आणि राजुरा या नगरपरिषदांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष विराजमान झाले असून, भाजपसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा ठरतो आहे.

वडेट्टीवार यांचा गृह मतदारसंघ असलेल्या ब्रह्मपुरीत काँग्रेसने सर्वात मोठा विजय नोंदवला. ब्रह्मपुरी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार योगेश मिसार यांच्यासह काँग्रेसचे २१ नगरसेवक विजयी झाले. हा विजय केवळ स्थानिक नव्हे, तर जिल्हा पातळीवरील काँग्रेसच्या संघटनशक्तीचे प्रतीक मानला जात आहे.

भाजपचे दिग्गज नेते तथा आमदार—सुधीर मुनगंटीवार (चिमूर), कीर्तीकुमार भांगडिया (नागभीड), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), करण देवतळे (वरोरा) यांचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या मतदारसंघांत काँग्रेसने सुरुंग लावला. बल्लारपूर, मूल, नागभीड, घुग्गुस, वरोरा आणि राजुरा येथे नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसने निर्णायक विजय मिळवला.

नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजताच काँग्रेसने नागपूर विभागाची जबाबदारी आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवली होती. या जबाबदारीला त्यांनी पूर्ण न्याय दिला. खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, तसेच स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी थेट भाजप आमदारांच्या मतदारसंघांत आक्रमक रणनीती राबवली. सभांद्वारे संघटन मजबूत केले, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आणि विरोधकांचे राजकीय गणित बिघडवले.

अखेर, प्रचारातील काटेकोर नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि राजकीय चातुर्याच्या जोरावर आमदार विजय वडेट्टीवार हे या निवडणुकीचे खरे ‘किंगमेकर’ ठरले, हे या निकालाने अधोरेखित झाले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments